सोलापूर : सेवानिवृत्त कामगारांची देणी द्या, हंगामी कामगारांचा बेकार भत्ता द्यावा, सन २०१९ पासून १२ टक्के पगारवाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी (ता. १२) कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर गेट बंद आंदोलन केले. प्रभारी कार्यकारी संचालक बंडू ऊर्फ खालिद शेख यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे कि, सेवानिवृत्त कामगार व चालू कामगार यांचा भविष्य निर्वाह निधी कारखान्याने संबंधित विभागाकडे भरला नाही, कामगारांचा बेकार भत्ता दिला नाही, पंधरा टक्के पगार वाढ व फरक ही दिला नाही, सन २०२४ पासून दहा टक्के पगार वाढ ही केली नाही. यासह कारखान्याच्या कामगारांची देणी द्या व मगच कंत्राटी कामगार कामावर घ्या, या मागण्यांसह जो पर्यंत कामगारांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कंत्राटी कामगारांना कारखान्यात कामावर जाऊ न देण्याची भूमिका जुन्या कामगारांनी घेतली आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. १२) सप्टेंबर रोजी गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी हनुमंत चव्हाण, दिलीप डोंगरे, संजय चव्हाण, रमेश काळे, सुरेश डोंगरे, संतोष भोसले, पोपट शेळके, राम कृष्ण हराळे, श्रीनिवास बचुटे, रवींद्र शेळके, रामदास शिंदे, विनोद सातपुते, माऊली चव्हाण, अशोक गोंडाळ आदींसह कामगार उपस्थित होते.