सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब कारखान्याचा सन २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू असून या हंगामात सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे २१ ते ३१ डिसेंबर अखेर गाळपास आलेल्या उसास प्रतिटन ३०२५ रुपयांप्रमाणे ऊस बिलाचा पहिला हप्ता बँकेत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
साखर कारखान्याचे अध्यक्ष बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब या कारखान्याचा सन २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू असून आजअखेर युनिट नंबर १ येथे १० लाख १४ हजार ८९७ मे.टन व युनिट नंबर २ येथे ३ लाख ४८ हजार ३६८ मे.टन असे एकूण १३ लाख ६३ हजार २६५ मे. टन गाळप झाले आहे. युनिट नंबर १ पिंपळनेर जिल्ह्यात गाळपात अग्रेसर असून याहंगामात २१ ते ३१ डिसेंबर या १० दिवसांत गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन ३०२५ रुपयांप्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग करण्यात आलेले असून या बिलासाठी ६१ कोटी ९८ लाख रुपये अदा केलेले आहेत. आज अखेर पर्यंत ऊस बिलापोटी ३५७ कोटी ६९ लाख अदा करण्यात आलेले आहेत. तसेच ३० नोव्हेंबर २०२५ अखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली असून त्यापोटी कारखान्याने ५५ कोटी ६९लाख रुपये अदा केलेले आहेत.
















