सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील या उभयतांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याने यंदा चार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी दिली. कारखान्याने २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसास २९०० रुपये दर दिला असून कामगारांना १ नोव्हेंबरपासून पगारवाढ लागू केली आहे. तर आता दिवाळीसाठी १५ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी आमदार मोहिते पाटील म्हणाले की, सभासद, कामगार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकायनि यंदाचा ऊस गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडेल, असा मला विश्वास आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ८६०३२ या ऊस जातीचा जास्तीत जास्त पुरवठा करावा. त्या उसाच्या दराबाबत स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल.