सोलापूर : सध्या ओंकार ग्रुप अंतर्गत एकूण २१ साखर कारखाने कार्यरत आहेत. यंदाचा गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ओंकार ग्रुपने आतापर्यंत ऊस बिलापोटी तब्बल २२ कोटी रुपयांचे बील अदा केले आहे. अक्कलकोट तालुक्याच्या इतिहासात सर्वोच्च ३००० रुपये मार्चनंतर ३१०० व एप्रिलनंतर ३२०० ऊस दर देण्याचा निर्णय ओंकार ग्रुपने घेतला आहे. यंदाच्या हंगामात उशीरा गाळप होणाऱ्या उसाला जादा दर मिळेल, अशी माहिती चेअरमन बाबूराव बोत्रे- पाटील यांनी दिली. ओंकार साखर कारखाना युनिट १५, रुद्देवाडी ऊस गाळपाला यशस्वीपणे सुरुवात झाली. या साखर पोत्यांचे पूजनप्रसंगी ते बोलत होते. ओंकार ग्रुपच्या परंपरेनुसार टनेजनुसार दीपावलीला मोफत साखर देणार असल्याची घोषणाही बोत्रे-पाटील यांनी केली.
काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य, हिरेमठ मैंदर्गीचे नीळकंठ शिवाचार्य महास्वामी, शिवबसव राजेंद्र विरक्त मठ खेडगी, श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर, डॉ. शांतलिंगेश्वर, विरक्त मठ दुधनी यांच्या उपस्थितीत साखर पोत्यांचे पूजन करण्यात आली. यावेळी बाबूराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले की, ओंकार ग्रुपचे दोन साखर कारखाने कार्यरत असून, यामध्ये दररोज सुमारे ११ हजार मे. टन ऊस गाळप केले जात आहे. सध्या गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये किंवा ऊस घालण्याची घाई करू नये. सर्व कारखान्यांमध्ये शेतकरी हिताला प्राधान्य देत लवकरात लवकर पूर्ण पेमेंट व ऊस गाळप करण्याचे धोरण राबविले जात आहे, असे ते म्हणाले.

















