सोलापूर : अथर्व ग्रुप कंपनीने औराद (मं) येथील लोकशक्ती साखर कारखाना कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून घेतला आहे. कारखान्याने उसाला प्रती टन ३,००० रुपयांचा दर जाहीर केला. यापैकी पहिला २८५० रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गही केला आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली. कारखान्याच्या पहिल्याच गळीत हंगामात चेअरमन श्री. खोराटे यांनी शेतकऱ्यांना अपेक्षित दर दिला. जाहीर केलेल्या दरानुसार आज (शुक्रवारी) पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले याबद्दल सभासद, ऊस उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी दर जाहीर केले आहेत. यापैकी लोकशक्ती कारखान्यातर्फे आता २८५० रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. तर दुसरा हप्ता प्रतिटन १५० रुपये दीपावली सणासाठी वर्ग केला जाणार आहे अशी माहिती चेअरमन खोराटे यांनी दिली. कारखान्याचे व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करून कारखान्याचा यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कारखान्याच्या व्यवस्थापनाने सांगितले की, लोकशक्ती कारखाना व्यवस्थापनाची कार्यपद्धती आणि ऊस पुरवठादार शेतकरी, कर्मचारी, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांविषयीची ध्येय-धोरणे उत्तम असल्याचे शेतकऱ्यांना समाधान आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप व्हावा, यासाठी शेती विभागामार्फत योग्य नियोजन सुरू आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी वेळेत ऊस पाठवावा, असे आवाहन करण्यात आले.
















