सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडे उपपदार्थामधून उत्पन्नाचे साधन नसतानाही शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा आहे. संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण राबवून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला ऊस दर देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि समाधानकारक दर देणे हीच आमची प्राथमिकता असून, म्हणूनच यंदा २,८०० पहिला हप्ता व दिवाळीला २०० असा एकूण ३,००० दर देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली. पहिल्या हप्त्याची रक्कम १ ते १५ नोव्हेंबर तसेच १६ ते ३० नोव्हेंबर या दोन्ही पंधरवड्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित बँका व पतसंस्थांकडे थेट वर्ग केली आहे अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
कारखान्याच्या वाटचालीबद्दल सांगताना व्हा. चेअरमन तानाजी खरात यांनी सांगितले की, कारखान्याने गेल्या ५४ दिवसांत १ लाख ५५ हजार २० मे. टन ऊस गाळप केले आहे. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा सध्याचा साखर उतारा १०.२४ टक्के असून सरासरी उतारा ९.०४ टक्के आहे. सध्या गाळपासाठी प्रामुख्याने ०२६५ जातीचा ऊस येत आहे. यावेळी संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी ऊस बिले, कामगारांचे वेतन तसेच तोडणी वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेत अदा केली जात असल्याचे सांगितले.
















