सोलापूर : दामाजी कारखान्यावरील सत्ता बदलानंतर महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या मर्जीतील कर्मचारी ठेवतात. मात्र, तीन वर्षांच्या कार्यकाळात आम्ही कुणाचीही अदलाबदल केली नाही. जो कारभार केला तो समोर आहे. त्यामुळे आमच्या सत्कारापेक्षा भविष्यातील कारखाना चांगला चालवून दाखवा, आम्ही तुमचा सत्कार करू, असे आवाहन दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.
समविचारी आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखान्यावर सत्ता स्थापन केलेल्या अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्यासह संचालक मंडळाच्या कारकीर्दीला तीन वर्षे यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ते म्हणाले, गतवर्षीच्या हंगामात ‘दामाजी’ने शेतकऱ्यांची बिले वेळेत दिल्यामुळे दामाजीवरील विश्वास शेतकऱ्यांचा वाढला. त्यामुळे यंदा अपेक्षेपेक्षा जास्तीचे गाळप करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दया सोनगे, रेवणसिद्ध लिगाडे, औदुंबर वाडदेकर, लता कोळेकर, बसवराज पाटील, भिवा दौलतोडे, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, निर्मला काकडे, अशोक केदार आदी संचालक उपस्थित होते.