सोलापूर : दामाजी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चालू गळीत हंगामामध्ये मे महिन्यापासूनच झालेल्या दमदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळितासाठी ऊस उपलब्ध होणार आहे. या हंगामात कारखाना ५ ते ६ लाख मे. टन ऊस गळीत निश्चितच करेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केला. चालू गळीत हंगामासाठी कारखान्यात अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात व संचालक बसवराज पाटील व गोपाळ भगरे यांच्या उपस्थितीत रोलर पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संचालक मंडळावर विश्वास ठेवून अडचणीत असलेली ही संस्था आमच्या ताब्यात दिली आहे. त्या विश्वासास पात्र राहून काम केले असे ते म्हणाले.
अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी सांगितले की, हा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, या भूमिकेतून इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस गाळप केले. ऊस उत्पादकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे तीन वर्षे स्पर्धेत राहून एफआरपीपेक्षा जास्त ऊसदर वेळेवर दिला आहे. कामगारांचा पगारही दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत दिला आहे. या हंगामात कारखाना पाच ते सहा लाख मे. टन ऊस गाळप करेल. कारखान्याचे सभासदत्व कोणतेही राजकारण न करता खुले केल्याने आज जवळपास ४३ हजार सभासद झाले आहेत. यावेळी संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे यांच्यासह संचालक, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.