सोलापूर : दामाजी, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांचा तोडणी, वाहतूक खर्च सर्वांत कमी

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी व पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांचा मागील हंगामातील ऊसतोडणी व वाहतूक खर्च कमी असल्याचे साखर आयुक्तालयाने कारखानानिहाय तोडणी, वाहतूक खर्चाच्या जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांच्या माहितीसाठी गाळप हंगाम २०२४-२५ मधील ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती व्हावी, यासाठी तपशील जाहीर केला आहे.

यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. हा हंगाम सुरू होताना मागील वर्षातील ऊसतोडणी व वाहतूक खर्च कारखानानिहाय किती आहे, तुलनात्मक आजूबाजूच्या कारखान्यांचा खर्च किती आहे, हे उस उत्पादक शेतकऱ्यांना समजण्यासाठी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी हा तपशील जारी केला आहे. राज्यात प्रचलित पद्धतीनुसार कारखान्यांमार्फत ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करून शेतकऱ्यांच्यावतीने त्यांच्या उसाची तोडणी व वाहतूक केली जाते.

ऊसतोडणी व वाहतुकीसाठी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या रास्त व किफायतशीर दराच्या (एफआरपी) देय रकमेतून कपात करण्यात येतो. सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्च शेतकऱ्यांना जास्त वाटत असेल तर संबंधित कारखान्यांच्या कार्यक्रमानुसार परंतु स्वतः मालक ऊसतोडणी करून कारखान्यास ऊस पुरवठा करू शकतात. अनेकदा कारखान्यांचा ऊसतोडणी व वाहतूक खर्च जास्त असतो, असा आरोप सातत्याने विविध शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जातो. या पार्श्वभूमीवर खर्चाची माहिती जारी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here