सोलापूर : देशात २० कोटींपेक्षा अधिक शेतकरी उसाचे उत्पादन घेतात. वाढत्या महागाईमुळे ऊस शेती तोट्यात आली आहे. साखरेची विक्री किंमत आजही ‘जैसे थे’ आहे. एफआरपीत सातत्याने वाढ होत असली तरी, साखर विक्रीची किंमत जैसे थे आहे. साखर विक्रीची आधारभूत किंमत (एसएमपी) वाढवावी, अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केली आहे. याबाबत चव्हाण यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
याबाबत चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे की, साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढली नसल्याने राज्यातील सुमारे ६० ते ७० साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. उत्पादन होणाऱ्या साखरेपैकी ८५ टक्के साखर ही खाद्यपदार्थ किंवा इतर चीजवस्तू निर्मितीसाठी वापरली जाते. मिठाई उद्योगासाठी व्यापारी चढ्या भावाने साखरेची विक्री करतात. त्यामुळे केंद्र सरकारने साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढवावी. त्यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होईल आणि त्यातून शेतकऱ्यांनाही अधिकचे पैसे मिळतील. सध्या साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत ही प्रतिक्विंटल ३१०० रुपयेच आहे. त्यामुळे साखर कारखानदारांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना जादा ऊस दर देण्यासाठी केंद्र सरकारने साखर विक्रीची किंमत प्रतिक्विंटल सहा हजार रुपये करावी.