सोलापूर : थकीत ऊस बिलप्रश्नी सहकार शिरोमणी कारखान्यावर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची जवळपास साडेतीन कोटी रुपये रक्कम थकवली आहे. या कारखान्यावर आरआरसीची कारवाई प्रस्तावित आहे. मात्र महसूल प्रशासनाच्या ढिसाळ धोरणामुळे ही कारवाई पूर्ण होऊ शकली नाही. यासंदर्भात रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील यांनी संबंधित कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागण्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केला होता. त्यामुळे उसाचे पैसे पंधरा दिवसांच्या आत द्या, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा सूचना सहकार शिरोमणी साखर कारखान्याला देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत याबाबत कारखाना प्रशासनाला तंबी देण्यात आली आहे. याबाबत रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे धोरण राबवले आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न दिलेल्या कारखान्यांवर फौजदारी कारवाई केली जावी. आता यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पंधरा दिवसाचा अवधी दिला आहे. थकीत ऊस बिलप्रश्नी महसूल उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या समवेत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी कारखाना प्रशासन व साखर सहसंचालकांशी संवाद साधत शेतकऱ्यांचे पैसे १५ दिवसांच्या आत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here