सोलापूर : साखर उद्योगातील सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. यशवंत कुलकर्णी यांना पुरस्कार

सोलापूर : साखर उद्योगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन इंडिया (पुणे) यांच्या वतीने दिला जाणारा साखर उद्योगातील ‘सर्वोत्तम कामगिरी’ पुरस्कार श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. पुणे येथे २२ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पांडुरंग साखर कारखान्यात डॉ. कुलकर्णी यांनी कार्यक्षमता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, को-जनरेशन व आसवनी प्रकल्पाचे विस्तारीकरण, उत्पादन वाढ, ऊस विकास आणि पर्यावरणपूरक धोरणे या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वात कारखान्याने उद्योगक्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत.

पुण्यातील या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला समारंभासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, ‘विस्मा’ चे अध्यक्ष बी. बी.ठोंबरे, ‘एसटीएआय’चे अध्यक्ष संजय अवस्थी, ‘एसआयएसएसटीए’चे अध्यक्ष एन. चिन्नप्पन आदी उपस्थित राहतील. कुलकर्णी यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पांडुरंग साखर कारखान्याचा पुरस्कारामुळे सन्मान वाढला आहे असे सांगत कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे, संचालक मंडळ व पांडुरंग परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here