सोलापूर: पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली. विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार निवडणुका पार पडल्या. उपचारासाठी बबनराव शिंदे अमेरिकेत असल्याने रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. जिल्हा दूध संघाचे चेअरमन, कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे यांचा नेतृत्वाखालील या निवडणुकीत प्रथमच जुन्या व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आता चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडीची प्रक्रिया सुरू आहे. आज, दि. १० रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे.
२००० मध्ये निर्मिती झालेल्या विठ्ठलराव शिंदे कारखान्याची धुरा माजी आ. बबनराव शिंदे यांच्याकडे आहे. शेतकरी व सभासदाचा जोरावर त्यांनी आतापर्यंत सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. यंदा प्रथमच रणजितसिंह शिंदे यांचे नेतृत्व या माध्यमातून दिसणार आहे. गेल्या निवडणुकीत बबनराव शिंदे चेअरमन तर वामन उबाळे यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली होती. यावेळी पुन्हा बबनराव शिंदे चेअरमन होणार की रणजितसिंह शिंदे ? यांच्याकडे नेतृत्व येणार, याची उत्सुकता माढा तालुक्यात आहे. व्हाईस चेअरमनपदावर कोणाला संधी मिळेल याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.


















