सोलापूर : साखर कारखानदारांकडील थकीत ऊस बिलांप्रश्नी जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांनी १७ जुलैला एफआरपी थकवणाऱ्या कारखानदारांची बैठक घेतली. यात रक्कम देण्यासाठी कारखान्यांना ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र या मुदतीत ८५ कोटी रुपये थकीत एफआरपीपैकी अवघे बारा कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे जवळपास ७२ कोटी रुपयांची ऊस बिले अद्याप थकीत आहेत. ऊस जाऊन सात ते आठ महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
जुलै महिन्याच्या पंधरवड्यात जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे ८५ कोटी ५४ लाख रुपये शेतकऱ्यांचे थकीत होते. पंधरा दिवसात अवघे १२ कोटी ८३ लाख रुपये दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही साखर कारखानदारांनी अद्याप फारसे पैसे दिलेले नाहीत. कारखान्याला ऊस देऊन आठ महिने उलटले आहेत. तरीही पैसे न मिळाल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. ज्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रूक येथील शेतकरी विलास जगताप यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात कारखान्याला ऊस दिला. आठ महिने झाले तरी एक रुपया मिळाला नाही.