सोलापूर : तिऱ्हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनावट करारपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी तौसिफ इक्बाल काझी (रा. मौलाली चौक, शास्त्री नगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जाकीर हुसेन अब्दुल सत्तार पिरजादे (रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. काकाच्या शेतातील उसाचे बिल सालगड्याला मिळू नये, म्हणून पुतण्याने हा प्रकार केला आहे. फिर्यादी पिरजादे यांनी ऊस बिलासंदर्भात हरकत घेतल्यावर तौसिफ काझीने दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार तौसिफने धनादेश दिला. बँकेत धनादेश टाकल्यावर तो बाऊन्स झाला. त्यानंतर तौसिफने पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि बनावट करारपत्र तयार करून ऊस बिलाचे सगळेच पैसे उचलले. त्यानंतर पिरजादे यांनी फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पिरजादे यांनी तौसिफ काझी यांनी काकाचे शेत बटईने केले होते. शेतात पिरजादे यांनी मोठा खर्च करून उसाची लागवड केली. पण, उसाचे बिल आल्यावर तौसिफ काझीने सगळे बिल आपल्यालाच मिळावे, अशी मागणी केली. त्यावर शेतातील उसाचे बिल मला मिळावे, अशी हरकत पिरजादे यांनी सिद्धनाथ साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांकडे १५ फेब्रुवारी २०२२ रोजी अर्जाद्वारे घेतली. उसाचे बिल मिळण्यास अडचण झाल्याने संशयित तौसिफने ५ जुलै रोजी अॅड. सय्यद अब्दुलजलिद हुसेन यांच्याकडून पिरजादे यांच्या नावे १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेतला. त्यावर तौसिफने बनावट स्वाक्षरी केली. त्यावरून उसाचे सगळे बिल घेतल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले.