सोलापूर : ऊस दरप्रश्‍नी सिद्धेश्‍वर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे आज आंदोलन

सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने ऊस गाळपाला सुरवात करून महिना उलटला आहे. मात्र, अद्याप ऊसदर व पहिली उचल जाहीर केली नाही. कारखान्याने ऊसदर जाहीर करण्यासाठी १८ डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती; मात्र अद्याप ऊसदर जाहीर केला नाही. त्यामुळे सोमवारी गव्हाणीत ठिय्या मांडून गाळप बंद पाडण्यात येणार आहे. ऊसदर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला. कारखान्याने गाळप झालेल्या उसाचे बिलही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाही. ऊस दर जाहीर करण्यासह पहिली उचल प्रतिटन ३४०० रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोमवारी आंदोलन करेल असे ते म्हणाले.

दरम्यान, तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगरने प्रतिटन दोन हजार ८०० रुपये ऊसदर जाहीर केला आहे. कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. तर बीबीदारफळ येथील लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीजने पुढील गाळप हंगाम म्हणजे २०२६-२७ साठी उसाच्या नोंदी घेण्यास सुरवात केली आहे. सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सर्व उसाची नोंद घेतली जात आहे. वेळेत नोंदणी करावी. यासाठी टाळाटाळ झाल्यास कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here