सोलापूर : धाराशिव जिल्ह्यातील निलेगाव येथील शेतकऱ्यांनी धोत्री येथील गोकुळ शुगरने २०२४- २५ च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे अजूनही दिलेले नाहीत, असा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाची दखल घेऊन कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना २५ जुलैपर्यंत खात्यावर पैसे जमा करण्याचे लेखी पत्र दिले. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तूर्त स्थगित केले आहे.
निलेगावातील जवळपास ३३ शेतकऱ्यांचे पैसे गोकुळ शुगरकडे अडकले आहेत. कारखान्याने २ हजार ७५५ रुपये दर देतो म्हणून आमच्याकडून ऊस घेतला. पैसे मिळावे यासाठी आम्ही कारखाना प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. तरीही पैसे मिळत नसल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ऊस बिल मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. तर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले की, कारखान्याच्या बँकेच्या कर्जाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलाची रक्कम वर्ग केली जाईल.