सोलापूर : बीबीदारफळ येथे लोकमंगल साखर कारखान्याने उसाला प्रतीटन ३,४०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रविवारी (ता. १४) शेतकरी संघटनेने आंदोलन केले. कारखान्याच्या गव्हाणीत ठिय्या मांडून गव्हाण बंद पाडण्यात आली. या वेळी कारखाना प्रशासनाकडून दोन दिवस वेळ द्या, अशी विनंती करण्यात आली. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उसाला ३४०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवले. ३४०० रुपये दर देण्याबाबत अगोदरच निवेदन दिले. त्या वेळेस का निर्णय घेतला नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. उशिरापर्यंत दराबाबत तोडगा निघाला नव्हता.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, उसाला तीन हजार चारशे रुपये दिल्याशिवाय कारखाना चालू देणार नाही. यामुळे आम्ही गव्हाणीत आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार आहे. या वेळी शेतकरी छावा संघटनचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, इकबाल मुजावर, नवनाथ मसलकर, पांडुरंग जाधव, सागर चिकने, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष विजय साठे, पोपट साठे, दशरथ पवार, श्रीकांत नन्नवरे, अमोल साठे, अण्णा कदम, स्वप्नील कदम, रोहित साठे, संकेत साखरे, ऋषी बारस्कर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

















