सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याचे मागील वर्षातील थकीत ऊस बिल आणि अन्य कारखान्यांच्या चालू ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारी (दि.२७ फेब्रुवारी) बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज कारखान्याने मागील वर्षी गाळप केलेल्या ऊस बिलाची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिली नाही.
रक्कम वसुलीसाठी कारखान्यावर आरआरसी कारवाई करण्यात आली तरीही कारखानदारांनी थकीत रकमा अद्यापपर्यंत दिल्या नाहीत, याकडे प्रादेशिक साखर सहसंचालकांचे लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्यापासून दि. १५ नोव्हेंबरपासूनच्या ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली नाही तर काही कारखान्यांनी दि. १ डिसेंबरपासूनची ऊस बिलाची रक्कम अद्याप दिली नाही, याकडे सहसंचालकांचे लक्ष वेधले आहे. वास्तविक गाळपाला ऊस घेऊन गेल्यानंतर १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे बंधन ऊस नियंत्रण कायदा १९६६ प्रमाणे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सचिव मोहसीन पटेल, इकबाल मुजावर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.


















