सोलापूर : जिल्ह्यात गाळप हंगाम सुरू झाला असला तरी जमिनीत अद्याप ओल असल्याने प्रत्यक्ष ऊसतोडणी लांबणीवर पडत आहे. अशा परिस्थितीत टोळीच्या मुकदमाकडून फड सुरू करण्यासाठी पैशांची मागणी सुरू असल्याने आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. माढा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. अतिपावसाने उसाची वाढ कमी प्रमाणात झाली असली तरी आता ऊस तोडणीयोग्य झाला असतानाही फडात अद्याप ओल कायम असल्याने टोळ्या तोडणीसाठी फडात पाठवता येत नाहीत. अशात कारखान्याकडून ज्या गावात टोळ्या दिल्या आहेत. तेथील शेतकऱ्यांना टोळी मुकादमाकडून पैशांची मागणी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर संकटच उभारले आहे.
जिल्ह्यातील राजवी शुगर्स वगळता कोणत्याही कारखान्याकडून अद्याप उसाचा दर जाहीर केलला नाही. ओलावा न संपल्यामुळे ऊसतोडणी उशिरा सुरू होत आहे. त्याचा थेट परिणाम कारखान्याच्या गाळप हंगामावर पडणार आहे. ऊस जास्त काळ शेतात राहिल्यास त्याचा वजनाने आणि साखरेच्या घनतेने तोटा होतो. शिवाय पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याची वेळही मागे ढकलली जाते. उसतोडीसाठी अतिरिक्त शुल्क, वाहतूक खर्च, वेतनवाढ यामुळे ऊस उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. शासनाने वेळेत लक्ष न दिल्यास शेतकरी आणखी आर्थिक कोंडीत सापडतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की नवीन कायद्यानुसार ऊसतोडणी व वाहतुकीचे सर्व पैसे कारखाना शेतकऱ्यांच्या ऊसातून वजा करूनच देतो. त्यामुळे कोणत्याही टोळीला किंवा मुकादमाला उसतोडणीसाठी वेगळे पैसे देणे बंधनकारक नाही. जर कोणी पैसे मागितले तर तत्काळ संबंधित कारखान्याकडे तक्रार करावी.












