सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्याच्या विरोधात साखर घोटाळ्याविरोधात बार्शीचे माजी आमदार राऊत यांची ईडीकडे तक्रार केली आहे. या प्रकरणात ईडीने कारवाई न केल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार, असल्याची माहितीही राऊत यांनी दिली. या तीन साखर कारखान्यांनी सुमारे शंभर कोटींचा साखर घोटाळा केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि सांगोला या तीन तालुक्यांतील कारखान्यांमध्ये हा साखर घोटाळा झाला आहे असे त्यांनी सांगितले.
अग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, माजी आमदार राऊत हे सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बेकायदा कर्जवाटप प्रकरणी सहकारमंत्री आणि न्यायालयात लढाई लढत आहेत. आता त्यांनी जिल्ह्यातील कथित साखर घोटाळ्याप्रकरणी थेट सक्तवसुली संचालनयाकडे (ईडी) तक्रार केली आहे. मी गेल्या आठवड्यात ईडीकडे तक्रार केली आहे. आता मी त्यांना पुन्हा एक स्मरणपत्र देणार आहे. त्यानंतरही संबंधित कारवाई झाली नाही, तर मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. असे ते म्हणाले. डीसीसी बँकेच्या तत्कालीन संचालकांनी बेकायदेशीर कर्ज वाटप केले आहे. हायकोर्टाने सुमारे एक हजार कोटींची वसुली निश्चित केली असून, त्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत. वसुली आणि जप्तीची कारवाई सुरू झाली आहे असे ते म्हणाले.