सोलापूर : माढा तालुक्यातील आलेगाव येथील राजवी ॲग्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यावर ऊस घेऊन येणाऱ्या ड्रायव्हर आणि क्लिनरसाठी सावंत परिवाराने मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. सावंत म्हणाले की, साखर उद्योगांमध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर हा खूप मोलाचा दुवा आहे. कधी कधी रात्र-रात्र ट्रॅक्टर चालवत त्याला ऊस पोहोच करावा लागतो. यातून बऱ्याचदा त्याच्या पोटाची आबाळ होते. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत.
राजवी ॲग्रोचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सावंत म्हणाले, राजवी ॲग्रोतर्फे ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्यासाठी मोफत जेवण हा उपक्रम प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला. या उपक्रमामुळे ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि क्लिनर यांचा वेळ आणि पैसाही वाचू शकतो. तसेच यातून त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हसू हे आमच्यासाठी अनमोल आहे. या उपक्रमामुळे ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि तीच आमची कमाई असेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर क्षीरसागर, जामखेड जनरल मॅनेजर काळे, खटके, भुसारे, भजनदास खटके, सौरभ सावंत आदी उपस्थित होते


















