सोलापूर : विविध शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने, चालू हंगामातील उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी, यासाठी खामगाव (ता. बार्शी) येथील येडेश्वरी साखर कारखान्यासमोर गेट बंद करत शुक्रवारी (ता. २) आंदोलन केले. येडेश्वरी कारखान्याच्या आजूबाजूचे सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांना पहिली उचल ३ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देत आहेत. परंतु, आपण २ हजार ८०० रुपये उचल दिली आहे. यामुळे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. हा अन्याय शेतकरी संघटना व आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही हा लढा लढू, असा इशारा आनंद काशीद यांनी दिला.
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव भोसले यांनी, शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर घेणे आणि कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्राधान्य देणे ही देखील जबाबदारी कारखान्याची आहे, असे मत मांडले. यावेळी विकास बारबोले, सदानंद आगलावे, समाधान भालेराव, रवींद्र मुठाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात कृष्णा काशीद, विक्रम घायतिडक, जोतिराम शिंदे, विनोद व्हनकळस, अतिश लोंढे, विष्णू शिंदे, किरण कानगुडे सहभागी झाले होते. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबाबत ‘सकाळ’ने येडेश्वरी कारखान्याच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

















