सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू

सोलापूर : साखर कारखानदार नेहमीच ऊसदराआडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करतात. शेतकरी घाम गाळतो आणि कारखानदार मलिदा आपल्यालाच जास्त मिळेल असा ऊस दर ठरवतात, अशी टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून भीमानगर (ता. माढा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून राज्यात उसाचे उत्पादन विक्रमी होत आहे. मात्र संघटित साखर कारखानदारांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित ऊसदर अजूनही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी कायम तोट्यातच राहिला आहे, अशी वस्तूस्थिती त्यांनी मांडली.

माजी खा. शेट्टी म्हणाले, बहुतांश साखर कारखाने आमदार, खासदारांचेच असल्याने ऊस दर कमी मिळतो. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी वेळोवेळी राज्यव्यापी आंदोलने उभी केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना ऊसदर वाढवून मिळाला. स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या साखरसम्राटांची दुकानदारी संघटनेने मोडीत काढली आहे. आता हेल्पलाइनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. यावेळी कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष अमरसिंह कदम, पोलिस निरीक्षक नारायण पवार, लेबर फेडरेशनचे अध्यक्ष भारत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रताप पिसाळ, सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब ढेकणे, औंदुबर महाडिक, सुरेश पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष विजय रणदिवे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here