सोलापूर : जिल्ह्यात यंदा ३४ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. हंगामाच्या सुरुवातील जादा ऊस दरासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. या आंदोलनांनंतर साखर कारखान्यांनी कागदोपत्री २८०० ते ३०२५ रुपयांपर्यंतचा पहिला हप्ता जाहीर केला. प्रत्यक्षात फक्त पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे पिंपळनेर व करकंब युनिट आणि श्री शंकर या पाच कारखान्यांनीच बेसिक रिकव्हरीप्रमाणे एफआरपी अदा केली आहे. तर उर्वरीत २९ कारखान्यांकडे १५ जानेवारीपर्यंतची तब्बल ६४२ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. दैनिक ‘अॅग्रोवन’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
साखर आयुक्तालयाला सादर केली जाणारी आकडेवारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीच्या रुपात बँकांमध्ये जमा होणारी रक्कम यात तफावत असल्याचे बोलले जात आहे. अनेक कारखान्यांकडे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील बिले अद्याप प्रलंबित आहेत. बहुसंख्य कारखाने एफआरपी देण्यात अपयशी ठरल्याने वाढीव पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर ७ फेब्रुवारीनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

















