सोलापूर : जयहिंद शुगरकडून एकरकमी तत्काळ ऊसबिले अदा, ६.५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

सोलापूर : दक्षिण सोलापुर तालुक्यातील आचेगांव येथील जयहिंद शुगरने गळीत हंगाम सुरु झाल्यापासुन वेळोवेळी जाहीर केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना सुरुवातीला प्रतिटन २९०० रुपये, मध्यंतरी ३००० रुपये तर सद्यस्थितीत ३१११ रुपयांप्रमाणे रक्कम अदा केले जात असल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख यांनी दिली. कारखान्याला ऊस घातल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बिलाची एकरक्कमी जमा होत असल्याने जयहिंदच्या ऊसपुरवठादार शेतकऱ्यांना आधार मिळत आहे.

चेअरमन गणेश देशमुख माने म्हणाले की, यंदाच्या वर्षी कोणालाही त्रास होऊ नये यासाठी जयहिंद परिवाराने सर्व बाबींची पुर्तता करत काळजी घेतली आहे. काटा-पेमेंट या नव्या सिस्टीमचा अवलंब करत कारखान्यात आज आलेल्या ऊसाला लागलीच वजन करुन दुसऱ्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत बिले अदा करण्याचे नियोजन केले आहे. यंदाच्या वर्षी गाळप हंगामाच्या सुरुवातीला कारखान्याकडून उसाला प्रतिटन २९०० दर देण्यात आला होता.

मध्यंतरीच्या काळात ३००० रुपये प्रतिटन व १८ फेब्रुवारीपासुन येणाऱ्या ऊसाला ३१११ रुपये प्रतिटन बिले अदा केली जात आहेत. यंदाच्या गळीत हंगामात जय हिंद परिवाराने आस्थागायत ६. ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यावेळी कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान काकासाहेब माने-देशमुख, व्हा. चेअरमन विक्रमसिंह पाटील, विजय पाटील, केन मॅनेजर राजेंद्र जेऊरे आदी उपस्थित होते.

जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख म्हणाले कि, साखर व्यवसायातील प्रचंड अडचणीमुळे जानेवारी-फेब्रुवारीतील आलेल्या उसाचे बिल अदा करण्यात सर्वच कारखानदारांना अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढत मात्र जयहिंद परिवार प्रत्येक दिवशी आलेल्या ऊसाचे बिल अदा करत आहेत. केंद्र सरकारने साखर व इथेनॉलचे दर वाढवले तरच कारखानदार शेतकऱ्यांना बरे दिवस येतील व कारखाने टिकतील. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here