सोलापूर – कुर्मदास कारखान्याने एफआरपी न देताच खोटी माहिती देऊन फसवणूक केली : स्वाभिमानी शेतकरी संघटना

सोलापूर : भैरवनाथ शुगरने साखर आयुक्तांना एफआरपी दिल्याची खोटी माहिती देऊन आरआरसीची कारवाई रद्द करवून घेतल्याचे प्रकरण सुरू असताना नवे प्रकरण समोर आले आहे. माढा येथील संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याने आरआरसीच्या कारवाईतून वाचण्यासाठी खोटी माहिती देऊन शासनाची व शेतकऱ्यांचीही फसवणूक केली, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम न देताच ती दिली असल्याची माहिती प्रशासनाला कळवली असा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे या तक्रारीत कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले की, कुर्मदास कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची अद्याप रक्कम दिलेली नाही. मात्र एप्रिल महिन्यातच त्यांनी साखर कार्यालयाला सर्व एफआरपी अदा केल्याचे कळवले आहे. आमच्याकडे २० ते २५ शेतकऱ्यांची तक्रार आली आहे. थकीत रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यापेक्षाही जास्त आहे. ऊस बिलासाठी शेतकरी कारखाना स्थळावर गेले असता त्यांना दमदाटी केली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे संबंधित कारखान्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. एप्रिल महिन्यात कारखान्याने प्रशासनाला तसा अहवाल दिला. यामुळे आरआरसीच्या कारवाईत या कारखान्याचा समावेश झाला नाही असे सांगण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थकीत ऊस बिलांबाबत चौकशी केल्यावर काही शेतकऱ्यांची उसाची रक्कम अद्याप दिली नसल्याचे कबूल केले. यामुळे संघटनेने तक्रार केली आहे. याबाबत, सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here