सोलापूर : चार महिन्यांवर पुढचा साखर हंगाम आला असला तरी जिल्ह्यातील साखर कारखानदार मागील हंगामात ऊस आणलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास तयार नाहीत, अशी स्थिती आहे. जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांनी एफआरपीचे तब्बल ९२ कोटी ७२ लाख रुपये थकवले आहेत. मागील १५ दिवसांत साखर कारखानदारांनी १२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. कारखाने उसाचे पैसे देत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर राज्यात मागील वर्षी गाळप हंगाम घेतलेल्या २०० पैकी १३२ साखर कारखान्यांनी एफआरपी व त्याहीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र ६८ कारखान्यांनी ४४० कोटी थकवले आहेत.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, राज्याच्या साखर आयुक्तांनी उसाचे पैसे थकविणाऱ्या जिल्ह्यातील नऊपैकी आठ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे. तरीही साखर किंवा त्यांच्याकडील मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे धाडस जिल्हाधिकारी कार्यालयाने केले नाही. १५ जून अखेर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १०५ कोटी १२ लाख रुपये थकीत होते. नंतरच्या १५ दिवसांत १२ कोटी ४० लाख रुपयांचे वितरण झाले आहे. त्यामुळे ९२ कोटी ७२ लाख रुपये देणे शिल्लक राहिले आहे. यामध्ये जयहिंद शुगर, सिद्धेश्वर साखर कारखाना, गोकुळ शुगर, श्री पांडुरंग श्रीपूर, सिद्धनाथ शुगर तिर्हे, मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट, इंद्रेश्वर शुगर बार्शी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे वाडी कुरोली पंढरपूर, व भीमा टाकळी सिकंदर या कारखान्यांचा समावेश आहे.