सोलापूर : शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत आम्हाला आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रतिटन ३,००५ रुपये इतका उच्चांकी दर दिला आहे. कोणी, किती दर दिला यापेक्षा आपण उच्चांकी दर देणार आहोत, ऊस उत्पादकांनी ऊस या कारखान्याला घालावा. कारखान्याकडून उच्चांकी ऊस दर दिला जाईल, असे प्रतिपादन ओंकार चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी केले. चांदापुरी (ता. माळशिरस) येथील ओंकार साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भाळवणीचा कारखाना व चांदापुरी कारखान्याने १७ लाख मे. टन करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, देशात सुमारे १०० लाख मे.टन हून अधिक ऊस गाळप करणारा ओंकार ग्रुप आहे. बोत्रे-पाटील यांनी ऊस उत्पादक व कामगाराचे पगार वेळेवर दिले. यांनी बंद असलेले कारखाने विकत घेत ऊर्जावस्थेत आणले. ते चांगल्या पद्धतीने चालवतात आजपर्यंत बँकेचे हप्ते वेळेवर भरले. देशातील सर्वात जास्त ऊस गाळप करणारे बोत्रे- पाटील असतील. नियंत्रण नसेल तर कारखाना चालवणे कठीण असून साखर कारखानदारी चालविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. यावेळी संचालिका रेखा बोत्रे- पाटील, सुप्रिया पाटील, शिवानी जंगम, संतोष जंगम, कारखान्याचे जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, सरपंच जयवंतराव सुळ, शारदा मगर, पै. दत्ता मगर, सर्जेराव पवार, अॅड. संदीप मगर आदींसह सभासद व ऊस उत्पादक उपस्थित होते. संतोष साठे यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र मगर यांनी आभार मानले.












