सोलापूर : ओंकार शुगरने पटकावला शुगर चषक क्रिकेट लीग चषक

सोलापूर : ओंकार शुगर संघाने सहकार महर्षी संघाला १४ धावांनी पराभूत करत महाराष्ट्रातील पहिल्या शुगर चषकावर आपले नाव कोरले. महाराष्ट्र शुगर चषक क्रिकेट लीगच्या पहिल्या पर्वातील सर्वच सामने रोमहर्षक झाले. धनश्री आष्टी, शिवाजीराव काळुंगे, संयोजक सुयोग गायकवाड यांच्या हस्ते ओंकार शुगर संघाला विजेतेपदाचा चषक व ५ लाख लाख रुपयांचे पारितोषिक तर उपविजेत्या सहकारमहर्षी संघाला उपविजेतेपदाचा चषक व २ लाख रुपये पारितोषिक देण्यात आले. विक्रम गाडे याला उत्कृष्ट फलंदाजाचे पारितोषिक व रोख ५१ हजार रुपये प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून डॉ. गायकवाड यांनी पुरस्कार पटकावला.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओंकार शुगर संघाने ८ षटकात ९३ धावांचे लक्ष्य सहकार महर्षी संघासमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना सहकारमहर्षी संघाला केवळ ७९ धावांपर्यंतच मजल मारता आली. बालाजी रूपनर याच्या तडाखेबंद अशा १६ चेंडूत ४६ धावा व १ षटकात १२ धावांत १ बळी टिपत केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे ओंकार शुगर संघाला विजयश्री प्राप्त करता आली. सहकार महर्षी संघाकडून विक्रम गाडेने २० चेंडूत ४५ धावा करत प्रतिकार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ओंकार शुगर संघाकडून रामराजे कराळे याने २ षटकात १८ धावांमध्ये २ बळी टिपत सहकारमहर्षी संघाला अडचणीत आणले. तत्पूर्वी उपांत्य सामन्यात ओंकार संघाने आवताडे शुगर संघावर तब्बल ४८ धावांनी एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहकारमहर्षी संघाने सीताराम शुगर संघावर ४८ धावांनीच मात केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here