सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये गेल्या ७५ दिवसांत ७ लाख मे.टन ऊस गाळप केला आहे. चालू हंगामात ३१ डिसेंबरअखेरची सर्व ऊस बिले कारखान्याने अदा केली आहेत. चेअरमन आ. प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळातील सर्व सदस्य व अधिकारी, कामगार यांच्या सहकार्याने कारखाना सुरळीत व विनाखंड चालू आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली. कारखान्याने ३१ डिसेंबरअखेरच्या ऊस बिलापोटी प्रती टन ३००० रुपयांनुसार सुमारे १७० कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. तर चेअरमन प्रशांत परिचारक यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारखान्यास उसाचा पुरवठा करावा, असे आवाहन केले.
याबाबत कार्यकारी संचालक कुलकर्णी यांनी सांगितले की, कारखान्याकडे ११ लाख टन ऊस गाळपासाठी नोंद झाला आहे. यापैकी निम्याहून अधिक उसाचे गाळप झाले आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यातील राहिलेल्या ऊस बिलाच्या, फरकाची रक्कमही अदा केली आहे. तोडणी वाहतूक करणाऱ्यांचीही बिले दिली आहेत. कारखान्याने ६,४०,००० क्विं. साखर उत्पादन करुन १०.७० टक्के साखर उतारा मिळवला आहे. ४.२२ कोटी युनिट वीजनिर्मिती करुन २.२० कोटी वीज निर्यात केली आहे. आसवनीमधूनही ६७ लाख लिटर उत्पादन घेतले आहे.
















