सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याकडून पोळा सणासाठी ७५ रुपयांचा हप्ता अदा

सोलापूर : येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसास कारखान्याने आतापर्यंत प्रतिटन २७,०० रुपयांप्रमाणे रक्कम अदा केली आहे. आता बैल पोळा सणासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन ७५ रुपये दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ऊस बिलापोटी प्रति टन २७७६ रुपये मिळाले आहेत. कारखान्याने ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षाही जादा रक्कम अदा केली आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी दिली. पोळा सणाच्यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्याची परंपरा पांडुरंग परिवाराचे प्रणेते सुधाकरपंत परिचारक यांनी आयुष्यभर जपली होती. ती परंपरा पुढे चालू ठेवली आहे, असे ते म्हणाले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, येत्या हंगामासाठी कारखान्याकडे सुमारे १५ हजार हेक्टर ऊस क्षेत्राच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामधून सुमारे १२ ते १४ लाख टनापर्यंत ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मागील सुमारे १५ वर्षापासून जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ऊसदर देण्याची कारखान्याची परंपरा आहे. नेहमीप्रमाणे पोळा सणासाठी कारखान्याने ऊस बिल देण्याची परंपरा यंदाही जोपासली आहे. गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन ७५ रुपयांचा हप्ता दिला आहे. कारखान्याने ऑफ सीझनमधील सर्व कामे पूर्ण केली आहेत, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here