सोलापूर : लोकमंगल समूहाच्या तिन्ही साखर कारखान्यांतील कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते जून २०२५ या कालावधीतील थकीत वेतन आणि २०२४-२५ गळीत हंगामातील जास्त कामाचा मोबदला अशी एकूण पाच कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली. लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माउली साखर कारखाना, बीबीदारफळ येथील लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीज, तसेच दक्षिण सोलापूरमधील लोकमंगल शुगर इथेनॉल जनरेशन इंडस्ट्रीज या तिन्ही कारखान्यांतील कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून थकीत वेतनामुळे अडचणीत होते.
थकीत वेतनामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., पुणे यांच्या आर्थिक सहकार्याने सोमवारी (ता. २१) सर्व थकीत रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. यासाठी कारखान्याच्या प्रशासन विभागाने व व्यवस्थापनाने समन्वय साधत विशेष प्रयत्न केले. आजच्या तारखेस कोणत्याही साखर कारखान्यातील कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन थकीत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, एखाद्या कर्मचाऱ्याची खात्यावर रक्कम जमा न झाल्यास त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.