सोलापूर : ऊस दर मागणीसाठी शेतकरी नेते समाधान फाटे, बाळासाहेब जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाखरी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण सहाव्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या हस्ते सरबत घेऊन मागे घेतले. राजू शेट्टी हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाखरी येथे आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि साखर कारखानदारांवर जोरदार टीका केली. दरम्यान, अन्य कारखान्यांवर आंदोलन सुरूच राहणार आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रती टन १५ रुपये द्या, अन्यथा तुमची काटामारी बाहेर काढू असा इशारा राज्यातील साखर कारखानदारांना दिला होता. त्यानंतर सर्वच साखर कारखानदारांनी १५ रुपयांची कपात करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले. याशिवाय, साखर कारखानदार साखर उताऱ्याची चोरी करून प्रती टन ४०० रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. कारखानदारांची चोरी रोखण्यासाठी यापुढे कारखान्यातून साखर घेऊन बाहेर पडणाऱ्या गाड्या अडवून त्यांची तपासणी करू. सरकारने राज्यातील एकाही साखर कारखान्यावर काटमारीची कारवाई केलेली नाही. एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साखर कारखानदारा काटामारी करतात हे मान्य आहे, असे शेट्टी म्हणाले. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील सुमारे ५१ साखर कारखान्यांनी ३५०० रुपयांच्या पुढे पहिली उचल दिली. तुलनेने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस दरात खूप मागे आहेत. साखर उताऱ्याची चोरी करणाऱ्या कारखानदारांना भविष्यात गुडघे टेकवायला भाग पाडू.

















