सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील गुंजेवाडी सावरगाव येथील रामगिरी शुगर्स लिमिटेड साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाने बनावट बैठका, कागदपत्रे तयार करून कारखान्याच्या जमिनीचे परस्पर गहाणखत करून जमिनीवर बोजा चढवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या व्यवहारात २ कोटी १० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सीमा आंधळकर (वय ६०, रा. सौंदरे, ता. बार्शी) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार नितीन छटवाल (रा. अंधेरी मुंबई), स्व. देविदास सजनानी, सजनानी, दीपा सजनानी, मार्क्स थोरात, केशव ईड्डा, विनित तापडिया (सर्व रा. पुणे, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हा कारखाना कै. शिवाजी डिसले व आंधळकर यांनी भागिदारीमध्ये घेतला होता. त्यांनी कारखान्याचे ४९ टक्के शेअर विक्री करून नियुक्त केलेल्या कार्यकारी संचालक मंडळाने फसवणूक केली. तुळजापूर येथील सबरजिस्ट्रार कार्यालयात ऑक्टोबर २०१५ मध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे दस्त तयार करून जमीन मॉर्गेज केली. त्या कागदपत्रांच्या आधारे २ कोटी १० लाख रुपये उचलून कारखान्याच्या जमिनीवर बोजा चढवला आहे. हा प्रकार एप्रिल २०११ ते ऑक्टोबर २०१५ यांदरम्यान दरम्यान घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.