सोलापूर : थकीत ऊसबिल प्रश्नी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यावर सोमवारी मोर्चा काढला. पंढरपूर, माढा परिसरातील कारखान्यांनी मागील हंगामातील उसापोटी शेतकऱ्यांनी पहिली उचल म्हणून प्रतिटन २,८०० रुपये दिले. मात्र, सोलापूर भागातील कारखान्यांनी प्रतिटन १,५०० रुपये दिले आहेत, हे दुर्दैवी आहे. कारखान्यांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा न केल्यास तीव्र आंदोलन करू, प्रसंगी अध्यक्षांच्या गाड्या फोडू असा इशारा भोसले यांनी दिला.
रयत क्रांती संघटनेचा हा मोर्चा सिद्धेश्वर कारखान्याच्या मेन गेटमधून आत नेण्यात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी रयत क्रांती संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल वेदपाठक, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब बोबडे, हनुमंत गिरी, बाबा ननवरे, रूपेश वाघ, किरण पाटील, दिनेश शिंदे, धनाजी रुपनर, तनुजा काळे यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भोसले यांनी सांगितले की, सिद्धेश्वर कारखान्याने शेतकऱ्यांना मागील हंगामातील आश्वासनाप्रमाणे काही दिले नाही. तर २०२४-२५ च्या गाळप हंगामात ऊस गाळप होऊन सात-आठ महिने होऊनही शेतकऱ्यांना एक रुपया मिळालेला नाही. वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांनी बिल मागितल्यावर प्रत्येकाला उचल म्हणून प्रतिटन १५०० रुपये दिले आहेत. मागील हंगामातील २३ ते २४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे आहे. सोलापूर परिसरातील साखर कारखान्यांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा न केल्यास कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडू.