सोलापूर : जिल्ह्यातील काही कारखानदारांनी ‘एफआरपी’चा नियम पायदळी तुडवून शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिलेले नाहीत. ऊस तुटून कारखान्याला गेल्यावर १४ दिवसांत एफआरपीनुसार पैसे देणे बंधनकारक असून, अन्यथा बँकेच्या व्याजदरानुसार व्याजासह एफआरपी द्यावी लागते. मात्र, शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याने कारखानदार कायद्यातील त्या नियमाला फाटा देत आहेत. तसेच उसाचे पैसे मिळावेत यासाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे आता रयत क्रांती शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे ७० कोटी रुपये दिलेले नाहीत. आगामी काळात एफआरपीसाठी खासगी कारखान्यांसमोरही ठिय्या मांडणार असल्याची घोषणा करण्यात आली.
रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी कारखान्यासमोर आंदोलन केले. आता जिल्ह्यातील ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी दिलेली नाही, त्या कारखान्यांसमोरही आंदोलने केली जाणार आहेत. याबाबत रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले की, आम्ही सध्या सत्तेत आहोत, तरीपण शेतकऱ्यांसाठी लढणे, त्यांना न्याय मिळवून देणे हा आमचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे सत्तेत असतानादेखील आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम, तोही वेळेत मिळावा म्हणून साखर कारखान्यांसमोर आंदोलन करत आहोत. ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिलेली नाहीत, त्यांना ती द्यावी लागतील.