सोलापूर : राज्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील कारखान्याकडे थकीत आहे. यासंदर्भात प्रशासनाने आठ साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई प्रस्तावित केली होती. यापैकी भैरवनाथ शुगरच्या आलेगाव व लवंगी येथील कारखान्यांनी कारवाई प्रस्तावित केल्यावर शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम दिली असल्याची माहिती साखर कार्यालयाला दिली. मात्र सदर रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली नाही, अशी तक्रार ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील यांनी पुणे येथील साखर आयुक्तांकडे केली होती.
सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, याबाबत प्रशासनाने संबंधित कारखान्याच्या लेखापरीक्षकाकडे अहवाल मागितला आहे. अहवाल सादर करण्यासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत दिली असून यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती साखर सहसंचालक सुनील शिरापूरकर यांनी दिली. भैरवनाथ शुगर या कारखान्याच्या लवंगी व आलेगाव युनिटने शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम न देताच प्रशासनाला रक्कम अदा केल्याची माहिती दिल्याची तक्रार साखर आयुक्तालयाकडे दाखल आहे. या संदर्भात त्यांनी कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील यांनी केली आहे. या प्रकरणी साखर आयुक्तालयाने सोलापूर येथील प्रादेशिक कार्यालयाला चौकशीचे आदेश दिले आहेत. सहसंचालक सुनील शिरापूरकर यांनी दोन्ही कारखान्यांच्या लेखापरीक्षकांना शुक्रवार दुपारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. इतर कारखान्यांच्या बाबतही शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांचीही चौकशी होईल, असे शिरापूरकर म्हणाले.