सोलापूर : सहकार शिरोमणी कारखाना चालवायला देण्यास बचाव समितीचा विरोध

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास दिला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इस्माइल वाखरी येथे सोमवारी (दि.१) सहकार शिरोमणी बचाव समितीची बैठक झाली. या बैठकीत कारखाना खासगी कंपनीच्या घशात घालण्यापेक्षा कल्याणराव काळे यांनीच तो चालवावा, आम्ही सहकार्य करू, त्यांना जमत नसेल तर बाजूला व्हावे असा इशारा सभासदांनी दिला. यावेळी ॲड. दीपक पवार, स्वेरीचे प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखाना ११ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. त्यांना विचारल्याशिवाय कोणीही कारखान्याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही, असेही सभासदांनी बजावले.

कारखान्याचे माजी संचालक ॲड. दीपक पवार म्हणाले की, कारखाना का चालवायला देत आहात, हे कल्याणराव काळे यांनी जाहीरपणे सांगावे. कै. वसंतदादा काळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत कष्टाने कारखाना उभारला. सभासदांनी विश्वास ठेवत कल्याणराव काळे यांना पाच वर्षांसाठी दिला आहे. त्यांनी तो चालवावा. जमत नसेल तर सभासदांनी दोन नंबरचे मतदान करून आमच्यावरही विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आम्ही चालवू. मात्र खासगी कंपनीला देऊन पापाचे धनी होऊ नये. यावेळी कारखान्याचे संचालक धनंजय काळे, साहेबराव नागने, सचिन पाटील यांच्यासह नामदेव ताड, भारत भुसे, दीपक गवळी आदींसह सभासद उपस्थित होते. यावेळी विष्णुभाऊ बागल, शहाजी नागणे, संजय पाटील, धनंजय कलागते, दत्तात्रय बागल, छगन पवार, नंदकुमार बागल आदींनी मनोगत व्यक्त केले. कारखाना चालविण्यास देण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही प्रशासकीय, न्यायालयीन पातळीवर व सभासदांमध्ये जाऊन रस्त्यावर उतरत विरोध करत कारखाना वाचवू अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. डॉ. बी. पीरोंगे यांनी सभासदांना विश्वासात घेत चेअरमन यांनी निर्णय घ्यावा. सभासदांना बोलवा, सर्वसाधारण सभा घ्या अशी मागणी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here