सोलापूर : सहकार महर्षी कारखान्यास ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार

सोलापूर : जागतिक सहकार वर्षानिमित्त कारखाना सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस को-ऑप बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्रीन वर्ल्ड को प्राइड पुरस्कार शंकरनगर-अकलुजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याला देण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना व विविध संस्थांमधून सर्व घटकांना सोयी, सवलती व सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर या पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे.

कारखान्यास हे पुरस्कार वितरण कॉसमॉस बँकेच्या सहकार सभागृहात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्याचे साखर आयुक्त विजय कोलते व राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याच्यावतीने व्हाईस चेअरमन शंकरराव माने- देशमुख व सेक्रेटरी अनिल काटे, अशोक डोके यांनी उपस्थित राहून तो स्वीकारला. कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या उसाला दिलेला दर, कारखान्याचे सुयोग्य प्रशासन व पारदर्शकता, साखर उत्पादनातील तांत्रिक गुणवत्ता, उत्पादन खर्च बचत आणि कारखाना व्यवस्थापनातील विश्वासार्हता यांचा समन्वय साधल्याने या पुरस्काराने कारखान्याचा गौरव करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here