सोलापूर : ‘सहकारमहर्षी’कडून ३००५ रुपये दर; ३४०० रुपयांच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’चा लढा सुरूच

सोलापूर : माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी (ता. १३) सकाळी १० वाजता सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, शंकरनगर-अकलूजच्या गेटसमोर प्रति टन ३४०० रुपये दरासाठी आंदोलन केले. यानंतर कारखान्याने तातडीने ऊस दराचा पहिला हप्ता जाहीर केला. कारखान्याने काढलेल्या अधिकृत पत्रकानुसार, गाळप हंगाम २०२५/२६ करिता ऊस उत्पादकांना ३० नोव्हेंबर पर्यंत गाळप झालेल्या उसासाठी प्रति टन २८५०/- पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला असून कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या व यापुढे गाळपासाठी येणाऱ्या उसाकरिता प्रति टन ३००५ रु. इतका दर निश्चित करण्यात आला आहे.

कारखान्याने ३००५ रू. पर्यंतचा दर जाहीर केला असला तरी, हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीपेक्षा कमी आहे. आंदोलनातील शेतकरी प्रतिनिधींनी कारखान्याच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कारखान्याने जाहीर केलेला दर समाधानकारक नाही. उसाचा उत्पादन खर्च आणि बाजारातील दर बघता ३४०० मिळणे आवश्यक आहे. पुढील दरवाढीसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली होती. स्वाभिमानी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ नेते मगन काळे, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, भानुदास सालगुडे, अमरसिंह माने-देशमुख, सचिन शेंडगे, राहुल बिडवे, मदन जाधव, दीपक सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here