सोलापूर : माळीनगर येथील सासवड माळी शुगर फॅक्टरी या साखर कारखान्यातील मिल रोलरचे पूजन कारखान्याचे पूर्णवेळ संचालक गणेश इनामके यांच्या हस्ते करण्यात आले. साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यावेळी प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचा हा ९१ वा गळीत हंगाम आहे. कार्यक्षेत्रत झालवडीखाली असलेले उसाचे क्षेत्र व मिळणारे उत्पादन याचा विचार करता यंदा कारखाने चार ते साडेचार महिने चालतील. सासवड माळी शुगर फॅक्टरी पाच लाख मे. टनांपर्यंत ऊस गाळप करेल, असा विश्वास यावेळी अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष गिरमे म्हणाले की, यंदा उन्हाळ्यात धरणातील पाण्याची परिस्थिती चांगली होती. तसेच मे महिन्यात मान्सूनपूर्व पडलेल्या पावसामुळे उसाचे टनेज आणि रिकव्हरीमध्ये वाढ होईल. गेल्या वर्षापेक्षा उसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस तोडणी यंत्रणेला आगाऊ उचल देऊन करार केलेले आहेत. यावर्षी ऊस हार्वेस्टर मशिनचा जास्तीत जास्त वापर करून ऊस तोडणी केली जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमास पूर्णवेळ संचालक परेश राऊत, उपाध्यक्ष निखिल कुदळे, संचालक सतीश गिरमे, निळकंठ भोंगळे, मोहन लांडे, विशाल जाधव, राजीव देवकर, शुगरकेन सोसायटीचे उपाध्यक्ष कपिल भोंगळे, एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे, संचालक पृथ्वीराज भोंगळे, कारखान्याचे चीफ इंजिनिअर जगताप, इलेक्ट्रिक इंजिनिअर जाधव, जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर, आदी उपस्थित होते.