सोलापूर : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळव झालेल्या उसाला २६०० रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. आता २०० रुपयांचा हप्ता जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याच्यावतीने देण्यात आली. गळीत हंगामात ज्या सभासद, बिगर सभासद, दिर्घमुदत करारदारांनी प्रथम ॲडव्हान्स रक्कम २६०० रुपये दिला आहे, त्यांना बैलपोळ्यासाठी प्रती टन २०० रुपये दिले आहेत. तर दिवाळीसाठी प्रती टन १०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. कारखाना चेअरमन जयसिंह मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे असे सूत्रांनी सांगितले.
कारखान्याने १५ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसास २०० रुपये व फेब्रुवारी २०२५ पासून पुढे गळीत झालेल्या ऊसास १०० रुपये प्रती टन अनुदान सभासदांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. दीपावली सणाकरीता १०० रुपे दिले जातील. एकूण कारखान्याकडून २९०० रुपये दर देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील हंगामाची तयारी सुरू आहे. पुढील हंगामात १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. व्हाइस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद आदी उपस्थित होते.