सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त शंभर रुपये हप्ता देण्यात येणार आहे. याचबरोबरच कामगारांना एक महिन्याचा बोनस आणि ऊस पुरवठादार, सभासद शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ३० रुपये किलो दराने ५० किलो साखर ऊस पुरवठादार व सभासद शेतकऱ्यांना घरपोच देण्यात येणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे यांनी कारखान्याच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी ही घोषणा केली. पुढील गळीत हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून, गाळपास येणाऱ्या उसाला इतर साखर कारखान्यांच्या पेक्षा एक रुपया तरी निश्चित भाव जास्त देण्यात येईल, असे ते म्हणाले.
प्रारंभी स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सभेत मांडलेले सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. विक्रमसिंह शिंदे यांनी बबनदादांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा होत असून, दोन महिन्यांत ते परतणार आहेत असे सांगितले. त्यांच्या अनुपस्थितीत आगामी गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. सभेस संचालक पोपटराव गायकवाड, अमोल चव्हाण, लक्ष्मण खूपसे, सुरेश बागल, नीलकंठ पाटील, रमेश येवले पाटील, वेताळ जाधव, सचिन देशमुख, शिवाजी डोके, विष्णुपंत हुंबे, सुहास पाटील जामगावकर, दिलीपराव भोसले, जनरल मॅनेजर पी. एस. येलपल्ले उपस्थित होते. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुरेश बागल यांनी आभार मानले.