सोलापूर : वाकी-शिवणे (ता. सांगोला) येथील धाराशिव कारखाना युनिट चारने बिलाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा या मागणीसाठी शिवसेना युवा सेनेचे सुभाष भोसले, शंकर मेटकरी, सचिन सुरवसे यांनी कारखाना कार्यस्थळावर सोमवारपासून शुक्रवारपर्यंत पाच दिवस उपोषण सुरू होते. हे उपोषण आज मागे घेण्यात आले. कारखान्याने शेतकऱ्यांना प्रति टन ३,००० रुपये दर देण्याचे मान्य केले. मागील हंगामातील राहिलेले प्रतिटन शंभर रुपये बिलही देण्याचे मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. कारखाना प्रशासनाच्या वतीने संचालक संतोष कांबळे, भागवत चौगुले, सुरेश सावंत, व्यवस्थापक प्रदीप पवार, जमीर काझी यांनी आंदोलनकर्त्यांना मागणी पूर्ण झाल्याबाबतचे पत्र दिले.
ऊस दराच्या मागणीसाठी आज महूद परिसरातील अनेक गावांमध्ये बंदही पाळण्यात आला होता. पहिले तीन दिवस कारखाना प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्याने गुरुवारी शेतकऱ्यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी महूद परिसरातील महूद, चिकमहूद, हलदहिवडी, वाकी, खिलारवाडी, गायगव्हाण अशा विविध गावांमध्ये बंद पाळण्यात आला होता. आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढत गेली. गुरुवारी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चेअरमन अभिजित पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र, चर्चा फिसकटली होती. आज ही चर्चा पूर्ण होऊन आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, डॉ. अनिकेत देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख भारत गवळी, मारुती ढाळे, बाळासाहेब ढाळे, कल्याण लुबाळ, नाना गाढवे, रवींद्र कदम, कालिदास भोसले, बाळासाहेब सराटे, सतीश दीडवाघ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
















