सोलापूर : संत कुर्मदास कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी व ट्रॅक्टर गाडी यासारख्या वाहनांना रस्ते वाहतूक सुरक्षतितेच्या दृष्टीने वाहन चालकामध्ये जनजागृती करून वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस निरीक्षक भरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी यांचे फिरते पथकातील क्षीरसागर व त्यांचे सहकारी अधिकारी यांनी कारखान्यास भेट दिली.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे ग्रामीण व शहरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी वाढली आहे. उसाने भरलेली वाहने रात्री-अपरात्री रस्त्यावरुन जाताना वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यास अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी यासारख्या वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मागील बाजूस रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच संबंधित वाहन, बैलगाडीचालक यांना मार्गदर्शन केले. सुरक्षिततेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर्स वाहनांना लावण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधीर पाटील, संचालक भालचंद्र पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक बाळासाहेब पवार, सचिव चंद्रहास गायकवाड आदी उपस्थित होते.

















