सोलापूर : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ५३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा काडादी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, संचालक राजशेखर पाटील आणि त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी होमहवन केले. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी, उसाचे क्षेत्र कमी प्रमाणात असल्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सभासद शेतकरी आणि कामगारांच्या संयमामुळेच प्रतिकूल परिस्थितीतून कारखाना लवकरच बाहेर पडून येणारा गळीत हंगाम मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी काडादी म्हणाले की, सह वीजनिर्मितीचा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प राबवत असताना त्यासाठी उभारलेली चिमणी चुकीच्या पद्धतीने आणि द्वेषामुळे पाडण्यात आली. तरीही शेतकरी, कामगारांच्या सहकार्यामुळे या अडचणीतून मार्ग काढला. चिमणी पाडल्यानंतरही दहा लाख टन उसाचे विक्रमी गाळप केले. राजशेखर शिवदारे यांनी काडादी हेच कारखान्याला अडचणीतून बाहेर काढू शकतात. तेव्हा शेतकऱ्यांनी असाच विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन केले. कार्यकारी संचालक समीर सलगर यांचेही भाषण झाले. संचालक गुरुराज माळगे, अॅड. शिवशंकर बिराजदार, सुरेश झळकी, अरुण लातुरे, महादेव जम्मा, विद्यासागर मुलगे, विलासराव पाटील, अशोक पाटील, शिवानंद बगले-पाटील, शंकर पाटील, काशीनाथ कोडते, श्रीदेवी माशाळे आदी उपस्थित होते.