सोलापूर : शेतकऱ्यांना उसाची रक्कम न देता ती दिल्याची माहिती प्रशासनाला देऊन आरआरसीची कारवाई रद्द करण्याची मागणी दोन साखर कारखान्यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करून शासनाला खोटी कागदपत्रे सादर केल्या प्रकरणात या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार साखर कार्यालयाकडे दाखल आहे. याबाबत भैरवनाथ शुगर आलेगाव व भैरवनाथ शुगर लवंगी या दोन साखर कारखान्यांनी दिलेला अहवाल फेटाळला आहे. दोन्ही कारखान्यांना फेरअहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते; मात्र अद्याप त्यांनी अहवाल सादर केले नाहीत. याबाबत त्यांना स्मरणपत्र पाठवण्यात येईल, असे प्रादेशिक सहसंचालक सुनील शिरापूरकर यांनी सांगितले.
दोन्ही कारखान्यांबद्दल ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील यांनी पुणे येथील साखर आयुक्तांकडे केली आहे. गेल्या आठवड्यात कारखान्याच्या लेखापरीक्षकांनी प्रादेशिक कार्यालयाकडे अहवाल दाखल केला. मात्र तो अपूर्ण असल्याचे नमूद करत फेरअहवाल सादर करण्याचे आदेश प्रादेशिक साखर कार्यालयाने दिले होते. मात्र सोमवारपर्यंत कारखान्यांकडून फेरअहवाल सादर झाले नाहीत. दोन्ही कारखाने माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्याशी संबंधित आहेत. या प्रकरणात साखर आयुक्त कार्यालयाला पाठवलेला अहवाल बोगस होता का, असेल तर याला जबाबदार कोण, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. याबाबत संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर तसेच न्यायालयात दाद मागणार आहे असे ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील यांनी सांगितले.