सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साखर कारखानदारांची बैठक घेतली. यावेळी शुक्रवारच्या (ता. १४) बैठकीला गैरहजर असलेले साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीवेळी यंदाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांनी दर जाहीर करण्याबाबत चर्चा झाली. ऊस दराची घोषणा नोव्हेंबर अखेरपर्यंत करू, अशी भूमिका कारखानदारांना घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन टप्प्यात ही बैठक घेतली. सर्व कारखान्यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत दर जाहीर करावेत, दर जाहीर केले नाही तर आम्ही कारवाई करू असा इशाराही या बैठकीतून देण्यात आला आहे.
या बैठकीला ओंकार पॉवर्स व्हीपी शुगर्स, जकराया शुगर, जयहिंद शुगर, भैरवनाथ शुगर (लवंगी), बबनराव शिंदे शुगर, ओंकार शुगर ( म्हैसगाव), भीमा सहकारी साखर कारखाना, लोकनते बाबूराव पाटील अॅग्रो, ओंकार साखर कारखाना चांदापूरी, आष्टी शुगर, सिताराम महाराज शुगर या कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कारखान्यांनी किती दर द्यावा हे त्या त्या कारखान्याच्या साखर उतऱ्यावर एफआरपीमध्ये ठरत आहे. कारखान्यांनी एफआरपीच्या कमी दर देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. हंगामात कारखान्यांनी दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. ते आता दूर झाले आहे.


















