सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे पिंपळनेर युनिट आणि करकंब युनिट या दोन्ही कारखान्यांमध्ये ११ ते २० जानेवारी या दहा दिवसांच्या कालावधीत झालेल्या ऊस गाळपापोटी प्रति टन ३०२५ रुपये प्रमाणे पहिला हप्ता सभासद, ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. या दहा दिवसांच्या ऊस बिलासाठी ५३ कोटी ७४ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तर २० जानेवारीअखेर चालू गळीत हंगामातील एकूण ऊस बिलापोटी एकूण ४७६ कोटी १९ लाख अदा करण्यात आलेले आहेत अशी माहिती कारखान्याचे संस्थापक – चेअरमन, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
चेअरमन शिंदे यांनी सांगितले की, कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब युनिटमध्ये चालू गळीत हंगामात गतीने ऊस गाळप सुरू आहे. पिंपळनेर युनिटमध्ये प्रतिदिन सरासरी १४,७०० मे. टन तर करकंब युनिटमध्ये सरासरी ५००० मे. टनापेक्षा जादा ऊस गाळप केले जात आहे. आजअखेर पिंपळनेर युनिटमध्ये १३,००,६४० मेट्रिक टन तर करकंब युनिटमध्ये ४,४५,५५२ मे. टन असे एकूण १७,४६,१९२ मे. टन गाळप झाले आहे. चालू आठवड्यातील ११ ते २० जानेवारी या दहा दिवसांमध्ये गाळप झालेल्या उसापोटी प्रति टन ३०२५ रुपयांप्रमाणे ऊस बिलाचा पहिला हप्ता सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

















